माणगाव ः प्रतिनिधी
मित्राचा वाढदिवस व कोकणातील दिवेआगार येथे पर्यटनासाठी निघालेल्या आळंदी रोडजवळील पाच तरुणांच्या एर्टिगा कारचा गुरुवारी (दि. 20) पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हीणी घाटात भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगावले व त्यांच्या सहकार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात जखमी झालेल्या दोघांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर ताम्हीणी घाटात विजय पाटील जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडत रस्त्यावर मदतीसाठी टाहो फोडत होता, मात्र अंधार व घाटरस्ता असल्याने कुठलाही
वाहनचालक मदतीसाठी थांबला नाही. त्यानंतर 100 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना अपघाताची माहिती दिल्याचे जखमी विजय पाटील यांनी सांगितले.
पुणे-आळंदी रोड येथील पाच तरुण मित्राचा वाढदिवस व पर्यटनासाठी रायगड दिवेआगार येथे एर्टिगा कारने (नं. एमएच 12 एम बी 1320) निघाले होते. गाडी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ताम्हीणी घाटातील कोंडेथर घाटातील अवघड वळणावर आली असता कारचालक निखिल घुलेचे (26) नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडाला आदळून टेकडीवर धडकली. अपघातात कारचालक निखिल घुले, चंद्रकांत निकम (28) व विक्रम सिंग (31) हे तीन तरुण जागीच ठार, तर विजय पाटील (28) व सुनील तेलंगे (27) गंभीर जखमी झाले. जखमींपैकी सुनील तेलंगेची प्रकृती गंभीर असल्याने त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातून पुण्यातील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले, तर विजय पाटीलवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास माणगाव तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास इंगवले करीत आहेत.