Breaking News

‘त्या’ बिबट्याचा बंदोबस्त करा! वनखात्याकडे वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीची मागणी

पनवेल : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्द तसेच भोकरपाडा गाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात वनविभागाने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच संतोष शेळके, सदस्य अक्षता म्हात्रे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन वनक्षेत्र अधिकार्‍यांना दिले आहे.

तालुक्यातील वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील मोहो, पालीखुर्द, वांगणी, आंबिवली तसेच भोकरपाडा गावाच्या मध्यभागी वनविभागाच्या असलेल्या वनपरिक्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून बिबट्या वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ग्रामीण भागात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या येत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या बिबट्याने परिसरातील दोन कुत्रीदेखील खाल्ल्याचे आढळून आले आहे. ग्रामस्थांच्या

म्हणण्यानुसार जवळपास आठ कुत्री बिबट्याने खाल्ली आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर वन अधिकारी सोनवणे यांच्या आदेशानुसार दिवस-रात्र या परिसरात गस्तीचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचल्यानंतर अधिकार्‍यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत, तसेच कुत्रीदेखील खाल्ल्याच्या घटनेला वन अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

त्यानुसार वन अधिकारी या परिसरात ठिय्या मांडून असून बिबट्याचा शोध घेत आहेत. यापूर्वीदेखील तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यात बिबट्या दिसून आल्याचे वृत्त होते, मात्र चौकशीअंती बिबट्या आढळून आला नाही. त्यानंतर या घटनेमुळे पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. तरी वनविभागाने अधिक कुमक मागवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना जंगलाच्या दिशेने जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

वनविभागाने दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वनक्षेत्र अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनाची प्रत पनवेलचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्याचे समजते.

तालुक्यातील भोकरपाडा गावात बिबट्या दिसून आल्याचे म्हणणे आहे. त्यानुसार आमचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप आम्हाला बिबट्या दिसून आला नाही. केवळ बिबट्याचे ठसे दिसून आले आहेत. त्यानुसार शोध सुरू आहे.

– सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पनवेल

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply