लॉकडाऊनच्या ताणातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकार पुढे सरसावले आहे. एकविसावे शतक हे भारताचे असेल. देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, हे मोदींचे उद्गार निराशेचे मळभ दूर करून देशाच्या अर्थव्यवस्थेत चैतन्याचे प्राण फुंकणारे आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता मोदी बोलू लागले आणि त्यांनी देशाने आजवर कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व अशा 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 20 लाख कोटी रुपयांचे हे पॅकेज म्हणजे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के इतके आहे, असेही ते म्हणाले. हे इतके अफाट आकडे बहुतांश सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे असतात, परंतु अशा एखाद्या पॅकेजच्या प्रभावाची समज असलेल्या उद्योगविश्वाकडून या पॅकेजचे लागलीच मनोभावे स्वागत करण्यात आले. मोदींच्या या पॅकेजचे तपशील जाणून घेण्यास आपण आत्यंतिक अधीर झालो आहोत, अशी प्रतिक्रिया नामवंत उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी रात्री व्यक्त केली होती. आता आपण देशाची अर्थव्यवस्था निव्वळ ‘सावरण्या’विषयी बोलायचे नसून ती अधिक ‘सशक्त’ करण्याच्या दिशेने आपले पाऊल पडत आहे हे मोदींच्या भाषणातून स्पष्ट झाले, असेही महिंद्रा म्हणाले. बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असलेल्या या आर्थिक पॅकेजचे तपशील उघड केले आणि मोदींनी म्हटल्याप्रमाणे देशातील विभिन्न वर्गांतील सर्वसामान्यांना यातून तातडीने दिलासा मिळणार आहे हे स्पष्ट झाले. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लादण्यात आलेल्या तब्बल सहा आठवड्यांच्या लॉकडाऊनचे परिणाम एव्हाना जाणवू लागले आहेत. देशाची अर्थव्यवस्था तिच्या नेहमीच्या क्षमतेच्या जेमतेम 50 टक्के एवढीच कार्यरत आहे. असे असताना मोदींनी जाहीर केलेले हे पॅकेज अर्थव्यवस्थेला निव्वळ सावरणारच नसून देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने मोठा कायापालट या अभूतपूर्व आर्थिक पॅकेजमधून घडून येईल, अशी प्रतिक्रिया उद्योगविश्वाकडून व्यक्त करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा सर्वांत मोठा फटका लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना बसल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती, परंतु श्रीमती सीतारामन यांनी पॅकेजचे तपशील जाहीर केल्यानंतर देशभरातील सात कोटी छोट्या व्यापारी आणि उद्योजकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. यापुढे सरकारचे धोरण देशी उत्पादनांना प्रोत्साहन देणारे असेल हे मोदींच्या भाषणातूनच पुरते स्पष्ट झाले होते. त्यात आता सरकारने सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटिर उद्योगांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद करण्यात आली असून कोणत्याही गॅरंटीशिवाय हे कर्ज या उद्योजकांना मिळणार आहे. चार वर्षांसाठी या उद्योजकांना हे कर्ज देण्यात येणार असून पहिल्या वर्षी कुठलाही हप्ता भरावा लागणार नाही. नोकरदारांनाही या पॅकेजने मोठा दिलासा दिला असून येत्या काळात त्यांच्या हातात पैसा राहील याची काळजी पॅकेजने घेतली आहे. मुख्य म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याने पगारदारांना आता त्याची चिंता लांबणीवर टाकता येईल. टीडीएस 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्यानेही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएफ फंडाची रक्कमही आणखी तीन महिन्यांकरिता सरकार भरणार असल्याने लाखो कर्मचार्यांच्या हातात पगाराचे थोडे अधिक पैसे पडतील तसेच कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळेल.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …