Breaking News

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण रायगड जिल्हा ठप्प

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शनिवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याचे रायगड जिल्ह्यात दिसून आले. कारवाईच्या भीतीने शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कडकडीत बंद पाळला गेल्याने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लावतानाच शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन घोषित केला आहे. या दोन दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून बंद करण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळीही दूध, मेडिकल अशाच सेवांना परवानगी असल्याने ते वगळता इतर सर्व काही बंद होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत रस्त्यांवर तुरळक लोक होते, तर दुपारनंतर पूर्ण शुकशुकाट होता.
नेहमीची वर्दळीची गजबजणारी ठिकाणे शांत शांत दिसून आली. हॉटेल्स, बार यांना पार्सल सेवा देण्यास मुभा असली तरी तीदेखील बंद असल्याचे पहायला मिळाले. अगदी किराणा मालाच्या दुकानांचेही शटर डाऊन असून भाजी मंडई, मासळी बाजारात नीरव शांतता आहे.
या लॉकडाऊनमुळे प्रवासी आणि अन्य वाहतूकदेखील कोलमडली. अधूनमधून जाणारे एखादे वाहन वगळता वाहतूक थांबली. मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अगदी तुरळक वाहने पहायला मिळाली. एसटीची सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी प्रवाशांअभावी बसेस आगारातच उभ्या होत्या, तर लांब पल्ल्याच्या अन्य जिल्ह्यांतून शुक्रवारी आलेल्या बसेस परत जाताना रस्त्यावर दिसून आल्या. मुंबई ते मांडवा, भाऊचा धक्का ते रेवस ही जलवाहतूकदेखील लॉकडाऊनमुळे ठप्प झाली.
ठिकठिकाणी असलेले पोलीस येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांची चौकशी करूनच त्यांना पुढे सोडत होते. रविवारीही असेच चित्र असणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply