उरण : प्रतिनिधी
होळीच्या उधाणात खोपटे गावाजवळ खार बंधिस्ती फुटून खाडीचे खारे पाणी शेतजमिनीत शिरल्यामुळे शेकडो एकर शेतजमिन नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर ही खारबंधिस्ती दुरूस्त केली नाही तर आणखी शेतजमिनी नापिक होण्याची शक्यता येथील शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्याला मोठा समुद्र किनारा आहे. या समुद्रकिनार्यातून किंवा खाडीतून समुद्राचे पाणी शेतीमध्ये शिरू नये यासाठी मोठ-मोठी बांधबंधिस्ती बांधण्यात आली आहेत. त्याची काळजी घेणे ही खारभूमी विकास मंडळाची आहे. मात्र अनेक ठिकाणी खार बंधिस्तीची कामे अर्धवट आणि निकृष्ट झाली असल्यामुळे उरण पूर्व भागात अनेक ठिकाणी खाडीची बांध बंधिस्ती फुटून शेतजमिनीत पाणी शिरते. खोपटे परिसरात ज्या ठिकाणी खारबंधिस्ती फुटली आहे. त्या ठिकाणची खार बंधिस्तीची कामे कित्येक वर्षे झाली नसल्यामुळे खाडीचे बांध कमकुवत होवून फुटत आहेत.
या ठिकाणी पुर्वी मिठागरे होती त्यावेळी नियमितपणे खारबंधिस्तीची दुरूस्ती त्यांच्याकडून करण्यात येत होती. मात्र सध्या या ठिकाणची मिठागरे बंद झाल्यामुळे खारबंधिस्तीची दुरूस्ती केली जात नाही. ही खार बंधिस्ती दुरूस्ती करण्याची जबाबदारी खार भूमी विकास विभागाची आहे. खारभूमी विकास योजनेमध्ये समुद्र किनारी किंवा खाडी किनारी उच्चतम भरतीच्या पातळीवर मातीचा बांध घालून भरतीचे पाणी उथळ जमिनीवर पसरणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होते.
मात्र गेल्या कित्येक वर्षात उरणच्या खार बंधिस्तीची दुरूस्ती केली नसल्यामुळे किंवा काही ठिकाणी अर्धवट दुरूस्ती केल्यामुळे ही खारबंधिस्ती फुटून खारे पाणी शेत जमिनीत शिरून शेतजमिन नापिक होते. एकदा खारे पाणी शेतीत गेल्यास कमीत कमी चारवर्षे त्या शेतीत भातपिक उगवत नाही.
बंधिस्ती लवकरात लवकर दुरुस्तकरण्याची मागणी दोन वर्षापूर्वी पुनाडे-केळवणे येथील खार बंधिस्ती फुटून हजारो एकर शेतजमिन नापिक झाली आहे. या शेतीमध्ये अद्यापपर्यंत पिक उगवत नाही. खोपटे गावाची शेती देखील नापिक होण्याचा धोका आहे. त्यातच होळीला मोठी भरती येत असल्याने ही बंधिस्ती फुटण्याचा धोका जास्त असतो. सध्या हे समुद्राचे पाणी शेता-शेतातून खोपटे गावापर्यंत पोहचले आहे. लवकरात लवकर ही बंधिस्ती दुरूस्त केली नाही तर गोवठणे, कोप्रोली, आवरे गावाजवळची शेती देखील नापिक होण्याची शक्यता आहे.