ठाकुर्लीजवळ बलात्कार प्रकरण; खाकीचा इंगा दाखवताच गुन्ह्याची कबुली
पनवेल : ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील खाडी किनार्याजवळ जंगलात निर्जनस्थळी एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत या तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानक भागात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञात तरुणांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राजवळ जाऊन त्यांना ‘आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे,’ अशी बतावणी करून खाडी किनारच्या झुडपांमध्ये निर्जनस्थळी नेले. पोलीस असल्याने पीडित तरुणी आणि मित्र घाबरले होते. निर्जन स्थळी जाताच तोतया पोलिसांमधील एकाने त्या तरुणीचे काही ऐकून न घेता ती प्रतिकार करत असतानाही तिच्यावर अत्याचार केले. शारीरिक संबंधाचे हे चित्रीकरण दुसर्या तोतया पोलिसाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले.
घडला प्रकार कोणाला सांगितला तर ‘आम्ही तुझी समाज माध्यमांवर बदनामी करू,’ अशी धमकी दिली. तसेच पिडित तरुणीला दुसर्या निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली.
पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, राहुल खिल्लारे, पोउप आंधळे, दिपविजय भवर, मपोउनिरी मोहीनी कपिले. तसेच अंमलदार पोलिस हवालदार भोसले, मोरे, जमादार, पाटिल, मुर्तडक, नागपुरे, घोलप, पोलिस नाईक भोई रायसिंग, पोलिस चालक कमोदकर, तसेच मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे याचे मार्गदशनाखाली अधिकारी सहा पोलिस निरीक्षक तारमळे, वनवे, पो. हवा खिलारे, स. पो.उप.निरी काटकर, पो. हवा/टिकेकर, मासाळ, पवार. पो. ना / भोईर, शिरीश पाटिल, घाडगे, कसबे, पवार, पाटिल, आहेर, आव्हाड यांचे मार्फतीने समांतर तपास सुरु केला. आरोपींबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांच्यामार्फत पोलिसांनी आरोपी विष्णु सुभाष भांडेकर (वय 25, रा.नेवाळी नाका) व आशिष प्रकाशचंद गुप्ता (वय 32, रा. डोंबिवली) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या नराधमांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास विष्णूनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.