माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी
महाड बाजुकडून पनवेलकडे निघालेल्या मॅक्झीमो टेम्पोची ठोकर लागून ईको कारचा गार्ड चेपला. त्यामुळे संतत्प झालेल्या ईको कारमधील इसमांनी टेम्पो चालक सूरज संजय चंदनशिवे, याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तर त्याचा सहकारी मोहम्मद खान यांना जबरदस्तीने गाडीत बसवून, इंदापूर वाढवण येथे नेवून तेथे हाताबुक्याने व रॉडने मारहाण केली व टेम्पो सोडविण्याकरीता दहा हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी चार अनोळखी इसमांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सूरज चंदनशिवे (वय 25, सध्या रा. रोहिदासनगर, ता. महाड, मुळ रा. बेळुंखी, ता. जत, जि. सांगली) हे त्यांचा सहकारी मोहम्मद खान हसे याच्यासह मॅक्झीमो टेम्पो (एमएच-06, एजी-9517) तून 17 मार्च रोजी रात्री महाड येथून पनवेलला जात होते. त्यांच्यो टेम्पोची एका ईको कारला ठोकर लागली. त्याचा राग येवून ईको कारमधील दोन अनोळखी इसमांनी सूरज यांना लोखंडी रॉडने तसेच हाताबुक्याने मारहाण केली तसेच त्यांच्या सोबत असलेल्या मोहम्मद खान याला जबरदस्तीने टेम्पोत बसवून इंदापून वाढवण येथे नेले. तेथे त्यांना रॉडने हाताबुक्याने मारहाण केली व टेम्पो सोडविण्याकरीता 10 हजार रूपयांची मागणी केली. या प्रकरणी सुरज चंदनशिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामादास इंगावले अधीक तपास करीत आहेत.