Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री तथा रायगड व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत. या वेळी कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार्‍या यंदाच्या या 12व्या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा 350हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत. महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, मधुमेह, नाक-कान-घसा, हाडांचे रोग, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार असून, नेत्रतपासणी व चष्मेवाटपही करण्यात येणार आहे. याशिवाय ईसीजी, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच रुग्णांसाठी न्याहारी, भोजन, वाहतूक आदी चोख व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांच्या सेवेसाठी सुकाणू, स्वागत, डॉक्टर व वैद्यकीय आणि रुग्ण सहाय्यक समिती, परिवहन, भोजन, औषधे वाटप अशा 24 समित्या, तसेच वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply