Breaking News

रविवारी देशभरात जनता कर्फ्यू

पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करीत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध. त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे, अशी मागणी मी करीत आहे. रविवारी (दि. 22) सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 19) देशवासीयांना संबोधित करताना केले. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले. राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा, असेही मोदींनी म्हटले आहे.
मी आज 130 कोटी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप कोरोनावर कोणतीही लस अथवा काही उपायही शोधण्यात आला नाही. त्यामुळे देशवासीयांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. जगातील ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेले हे संकट साधेसुधे नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाने संयम ठेवून संकल्प केला पाहिजे की केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करू. कोरोनाच्या संकटाने जगाला ग्रासले आहे. जगातील सगळ्या मानवजातीला कोरोनाचा त्रास होत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळीही जगातील सगळ्या देशांवर इतका गंभीर परिणाम झाला नव्हता, जेवढा कोरोनामुळे होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीयांनी कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला याचे मला कौतुक आहे, असेही मोदींनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून असे वातावरण तयार झाले की आपण संकटापासून सध्या वाचलो आहोत. सगळे काही ठीक आहे, मात्र जागतिक महामारी असलेल्या कोरोनामुळे निश्चिंत होण्याची ही वेळ नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply