कुणीही उपस्थित न राहण्याचे उपमहापौरांचे आवाहन
पनवेल ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाड येथील चवदार तळे वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व भीमसैनिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रिपाइंचे कोकण प्रदेश अध्यक्ष
तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे.
मानवाच्या मूलभूत न्याय्य हक्कांसाठी ललकारी देत महामानव डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या क्रांतिभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करीत जुन्या चालीरीती, रूढी-परंपरेला मूठमाती दिली आणि सामाजिक समतेच्या क्रांतिपर्वाला प्रारंभ केला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रह संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. या वर्धापन दिनाला 93 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे चवदार तळ्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिस्तंभाला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जगभरात अनेक सोहळे, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आपल्या देशातही याबाबत खबरदारी घेतली जात आहे.
येणारे 15 दिवस लक्षात घेता ही खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. या विषाणूचा संसर्ग पाहता शासनानेही यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
क्रांतिभूमीत होणार्या या कार्यक्रमास हजारो भीमसैनिकांची गर्दी असते आणि त्याचा विचार करून खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही या ठिकाणी उपस्थित राहू नये, असे आवाहन उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी केले आहे.