अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. पक्षातील स्थानिक पदाधिकार्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, पाली व खालापूर या नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. सहा नगरपंचायतींच्या 81 जागांसाठी 237 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागणाव आणि म्हसळा या दोन नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात शिवेसना आणि काँग्रेस आघाडी झाली आहे. पाली नगरपंचायतीत राष्ट्रवादी-शेकाप युती झाली आहे. तिथे शिवसेना व भाजप स्वबळावर आपली ताकद आजमावत आहेत. तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे यांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. खालापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शेकाप, मनसे, भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. पोलादपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे, मात्र शिवसेना तिथे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. भाजप आणि मनसेनेही काही प्रभागांत आपले उमेदवार उभे केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतून व्हाव्या असा मानस राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला होता, मात्र स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे महाविकास आघाडी होऊ शकली नाही.
– निकालासाठी महिनाभर प्रतीक्षा
ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमधील ओबीसींच्या 21 आरक्षित जागा रद्द होणार असून नव्या आदेशानुसार 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रायगडमधील 81 जागांसाठी मंगळवारी (दि. 21) रोजी मतदान होत आहे. दोन्ही मतदानाची मतमोजणी 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी उत्सुक असलेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.