कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य दिले गेले.
कोरोनामुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकार अहोरात्र प्रयत्न करीत आहे, मात्र जनतेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. सरकार वारंवार सूचना करीत आहे की घरात बसा, बाहेर पडू नका. त्यानुसार माथेरानकरही सूचना पळत आहेत, पण जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची रेलचेल सुरू आहे. येथील सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात रेशनिंग मिळत आहे असे नागरिकांना समजल्यावर हे धान्य घेण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतून लोक आले होते. त्यामुळे गर्दी झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे व सहकार्यांनी ही गर्दी हटवली व व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी यांनी प्रत्येकाला नंबरप्रमाणे धान्य देण्यास सुरुवात केली. त्यानंतर येथील गर्दी हटून एकेकास बोलावून धान्य वाटप करण्यात आले.