मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका सोमवारी (दि. 13) मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधक राईचा पर्वत करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी पुस्तकावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवरायांची बदनामी केली होती, पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते आणि त्या पुस्तकावरील वाद मिटला होता, अशी आठवणही मुनगंटीवार यांनी विरोधकांना करून दिली. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ’इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ असे काँग्रेसचे लोक म्हणायचे, तसेच इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गामातेशी करण्यात आली होती. त्याला मात्र कुणीच आक्षेप घेतला नाही याकडेदेखील मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. त्यामुळेच विरोधक खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत, असा आरोप या वेळी मुनगंटीवार यांनी केला.
‘त्या’ पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही!
नवी दिल्ली : ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकात एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी स्पष्ट केले आहे. भाजप महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर मयुख यांची प्रतिक्रिया ट्विट केली आहे.
Check Also
आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …