भर उन्हाळ्यात उडाली तारांबळ; तत्काळ उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील नवघर गावात भर उन्हाळ्यात खाडीला आलेल्या उधाणाच्या भरतीचे पाणी शिरले असून येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मागील कित्येक वर्षे विकासकामांसाठी बहुतांशी जमीन भरावाखाली गाडली गेली आहे. त्यामुळे गावागावातील पाण्याच्या निचर्याचे स्रोत बंद झाले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या फैलावामुळे भयभीत झालेल्या नवघर वासीयांची या उधाणाच्या भरतीने त्रेधातिरपीट उडाली आहे. परिणामी, दररोज येणार्या समुद्राच्या भरतीचे पाणी गावामध्ये शिरू लागले आहे. याचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. वेगाने येणार्या उधाणाच्या भरतीचे पाणी या पूर्वी गावालगत येत होते, मात्र ते आता थेट गावातील घरांच्या अंगणात शिरू लागल्याने येथील ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच समुद्रकिनार्यालगत असलेले होल्डिंग पाँडचे फ्लॅप गेट येथील सिडको अधिकार्याने उघडे ठेवून दिल्याने हे समुद्रातील उधाणाच्या भरतीचे खारे पाणी नवघर गावात शिरल्याची घटना घडली आहे. उरण तालुक्यातील अधिक गावे ही खाडीकिनार्यालगत आहेत. येथील शेतकरी भरतीच्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरू नये यासाठी वर्षानुवर्षे खाडीकिनार्याची बांधबंधिस्ती करीत होते. भरावामुळे समुद्राच्या पाण्याचा समतोल राहिला नसून, ते पाणी थेट गावात शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. सिडको प्रशासनाने या परिसरातील पाण्याच्या निचर्याची व्यवस्था करावी अन्यथा यापुढे थेट नवघर तसेच बाजूच्या कुंडेगाव व भेंडखळ गावातील घरांना या समुद्राच्या भरतीचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘प्रशासनाने उपाययोजना करावी’
सिडको प्रशासनाने या नवघर गावात शिरत असलेल्या पाण्याच्या निचर्यासाठी योग्यतेने पाहणी करून नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा भर उन्हाळ्यात किंवा अन्य कोणत्याही वेळी या गावात समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शिरून अनेकांच्या घरातील अत्यावश्यक वस्तू व उपकरणांचे नुकसान होऊन या नागरिकांची नियमितची डोकेदुखी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.