अलिबाग ः प्रतिनिधी
धान्याचा काळाबाजार करणार्या अलिबाग तालुक्यातील रेशन दुकानावर रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या कारवाईत 51 हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
टाळेबंदीच्या काळात शासनाकडून रेशन दुकानांवर स्वस्त दरात धान्यविक्री केली जात आहे, परंतु काही रेशन दुकानदार शिधापत्रिका धारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने धान्यविक्री करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचे आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिले आहेत. त्यानुसार धान्याचा काळाबाजार करणार्या रेशन दुकानदारांविरोधात रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत प्रवीण रणवरे आणि रामचंद्र रणवरे यांनी रेशन दुकानावर दिला जाणारा तांदूळ लाभार्थी नसलेला अमीर गुलाम हुसेन जमादार यास प्रतिकिलो 10 रुपये दराने विकला. याची माहिती मिळताच या रेशन दुकानावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे व त्यांच्या पथकाने ही
कारवाई केली.