51 लाखांचा दंड वसूल
पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनावश्यक घराबाहेर पडून वाहन चालवणार्यांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 51 लाख 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविड-19 या महामारीला सामोरे जात असताना शासन विविध उपाययोजना, निर्णय घेत आहे. नागरिकांनी घरातच बसून काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे, मात्र काही जण विनाकारण घराबाहेर येत आहेत. त्याचबरोबर खासगी वाहनांना रस्त्यावर फिरविण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी केलेली आहे. असे असताना लोक वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे रायगड पोलिसांनी अशा चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 51 लाख 15 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. संचारबंदीच्या काळात उल्लंघन केल्याप्रकरणी 3 हजार 31 वाहने जप्त करण्यात आली, 17,795 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.