पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ९) पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीपूर्वी मंत्री डॉ. वुईके यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी झालेल्या बैठकीत कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही, प्रशासकीय पातळीवरील समन्वय आणि पुढील दिशा यावर विचारमंथन करण्यात आले. या दौऱ्याचे नियोजन आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अपर आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले होते. यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, आयुक्त मंगेश चितळे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रांत अधिकारी पावन चांडक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस रूपेश नागवेकर, सतीश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महेशकुमार मेघमाळे, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आदिवासी वस्ती येथे भेट दिली. परिसराची पाहणी करून महसूल विभाग व पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी तेथील समाजमंदिरामध्ये बैठक घेऊन कातकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यानंतर पनवेल महापालिका मुख्यालयात आदिवासी, महसूल इत्यादी विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित प्लॉटवरील कातकरी समाजाच्या मालकी हक्काबाबत चर्चा झाली असता महापालिकेकडून या विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे महापौर नितीन पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजनेंतर्गत ११६ प्रस्ताव आदिवासी विकास विभागास मनपाकडून सादर करण्यात आले असून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र आदिवासी बांधवांना पुढील तीन महिन्यांत मिळेल यासाठी प्रयत्न करू, असे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील १६८० आदिवासी कुटुंबे आणि २० आदिवासी वस्त्यांचा आढावा घेण्यात आला.
आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम जनमन योजना, राणी दुर्गावती योजना व विविध कल्याणकारी योजनांची पनवेलच्या शहरी भागातील अंमलबजावणीची व सध्यस्थितीची माहिती यावेळी मंत्री डॉ अशोक वुईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन याबाबत सूचना दिल्या. शहरी भागातील आदिवासी समुदायकडे दुर्लक्ष होणार नाही, त्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविले जातील तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या दौऱ्यादरम्यान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट घेऊन स्वागत केले तसेच विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार आदी उपस्थित होते.
कोट
कातकरी समाजाचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविण्यात येईल. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत पनवेलच्या शहरी भागात राहणाऱ्या सर्व आदिवासी कुटुंबांकडे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे असतील तसेच पात्र सर्व नागरिकांना योजनांचा लाभ मिळेल याची काळजी प्रशासनाने घ्यावी. पीएम जनमन योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यात यावा.
-डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकासमंत्री
Check Also
‘लोकनेता : एक युगपुरुष’… रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उलगडला जीवनप्रवास
खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper