खोपोली : प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये अनेक कुटूंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून, कोणीही उपाशी राहू नये यासाठी खालापुरात प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. खालापूर तालुक्यात 131 रास्तभाव दुकान आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी कुटूंबाला तांदूळ आणि गहूपुरवठा करण्यात आला आहे. 8677 अंत्योदय लाभार्थींना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप करण्यात आले असून, एक लाख 4532 प्राधान्य कुटूंब लाभार्थी संख्येनुसार तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू प्रतिमाणसी वाटप केल्याचे पुरवठा अधिकारी महेश पाटील यानी सांगितले. याशिवाय अंत्योदय मोफत अन्न योजनेतंर्गत पाच किलो तांदूळ जवळपास 27096 लाभार्थींना वाटप झाल्याचे पुरवठा विभागाकङून सांगण्यात आले. मोफत धान्य अन्नसुरक्षा योजनेत 1लाख 20305 लाभार्थीना पाच किलो तांदूळ वाटप झाला आहे. शिधापत्रिकेची आधार जोडणी समस्यामुळे अनेकाना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी एपीएल योजनेचे मे व जून महिन्यात प्रत्येक व्यक्तीला एक किलो तांदूळ 12 रुपये व गहू आठ रुपये किलोप्रमाणे मिळणार असल्याचे पुरवठा अधिकारी यानी सांगितले. शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबांची अडचण होऊ नये यासाठी तहसीलदार इरेश चप्पलवार यानी जीवनावश्य वस्तूंचे किट तयार करून जवळपास अडीच हजार कुटूंबांना त्याचे वाटप केले आहे. याशिवाय स्थलांतरित दोनशे मजूर खालापुरात महिनाभरापासून असून, त्यांचीदेखील राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची सोय तहसील कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे. साखरेचा पुरवठा उशिरा झाला. शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबांनादेखील धान्य मिळण्याची तरतूद केली जात आहे.
-महेश पाटील, पुरवठा अधिकारी, खालापूर तहसील