आरोग्य प्रहर
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार मान वर काढत असतात. त्यातच सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खडीसाखरेचं पाणी लहान मुलांना पिण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्यांनीसुद्धा खडीसाखरेचं पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. तापवणार्या उन्हात खडीसाखरेचा वापर थंड पेय तयार करण्यासाठीही केला जातो. एक ग्लास पाण्यात खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीराला आराम मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते. उन्हाळ्यात अनेकदा तोंडाला लालसरपणा येऊन फोड येतात. तोंडात फोड आले असतील तर खडीसाखरेत वेलची घालून पेस्ट तयार करा. याशिवाय तोंड येण्यामुळे होणारी जळजळ आणि वेदनाही कमी होतात. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खडीसाखरेचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गरम दुधामध्ये केसर आणि खडीसाखर मिश्रित करुन प्यायल्यास शरीरात शक्ती आणि स्फूर्ती येते. सोबतच शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. जर वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चिमूटभर काळीमिरी आणि खडीसाखरेचे चाटण मधातून घ्या. इतकंच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा आहारात खडीसाखरेचा समावेश करायला हवा.