पनवेल : बातमीदार
लॉकडाऊनमुळे महिनाभर रखडलेल्या नव्या सबस्टेशनच्या कामातील अडथळे दूर झाले असून महापारेषणच्या अधिकार्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे महाकाय ट्रान्सफॉर्मर औरंगाबादहून सुरक्षितपणे पनवेलमध्ये आणण्यात आला. पुढील दोन दिवसांत पनवेल तालुक्यातील 10 फीडरवरील वीजग्राहकांना नव्या सबस्टेशमधून वीजपुरवठा सुरू होईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल तालुक्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन महावितरणच्या मागणीनुसार महापारेषणकडून 33 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पनवेलच्या वेगवेगळ्या 10 फीडरला वीजपुरवठा करण्यात येत असलेल्या नव्या सबस्टेशनचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असताना करोनामुळे सर्व काम ठप्प झाले. महावितरणचा पनवेल उपविभाग आणि पनवेल ग्रामीण या दोन विभागांतील कार्यालयांमधून वीजपुरवठा करण्यासाठी ओएनजीसी येथे महावितरणच्या आवारात महापारेषणचे सबस्टेशन आहे. विजेची मागणी वाढत असल्यामुळे महापारेषणकडून महावितरणने पनवेलमध्ये 33 केव्ही व्होल्टेज लेव्हलची
मागणी केली होती.
महापारेषणच्या ओएनजीसी येथील 22 केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनवरून महावितरणला 10 फीडरवर वीजपुरवठा केला जातो. महापारेषणने नव्याने 33 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन बसविण्याचे काम सुरू केले होते. काम शेवटच्या टप्प्यात आले असताना औरंगाबाद येथून 33 केव्ही क्षमतेचा जीआयएस प्रकारचे सबस्टेशन आणायचे होते. 30 हजार लिटर ऑईलची खरेदी करण्यात आली होती. दोन कोटी रुपये किमतीचा सबस्टेशनचा विमा देखील काढण्यात आला होता. त्यातच लॉकडाउन झाल्यामुळे औरंगाबाद येथे खरेदी केलेले सबस्टेशन पनवेलला आणण्यात अडथळा आला. करोना विषाणूमुळे वीज खंडीत न करता ग्राहकांना अखंडीत वीज देण्याचे मोठे आव्हान महावितरण आणि महापारेषणवर होते.
अखेर शुक्रवारी ट्रान्सफॉर्मरचा ट्रेलर पनवेलमध्ये पोहचल्यामुळे अधिकार्यांपुढचे मोठे संकट दूर झाले आहे. ट्रान्सफॉर्मर जोडणीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून इतर यंत्रसामग्री देखील लवकरच पोहोचेल. त्यामुळे पुढील दोन दिवसांत काम पूर्ण होऊन पनवेल तालुक्यातील पळस्पे, पनवेल, नवीन पनवेल, नेरे, खांदा कॉलनी आदी भागांत 33 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा होणार आहे.
सबस्टेशन बसविण्याच्या जागेवर नव्याने आणलेला ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी ट्रेलर आत नेला असता ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल टँकचा अडथळा आला. त्यामुळे ऑइल टँक रिकामा करून ट्रेलर आत नेला जाणार आहे. शनिवारी एक तास वीज खंडीत करून काम पूर्ण करण्याचे प्रयत्न होते, मात्र त्याला यश आले नाही. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल.
-अमोल वाघमारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महापारेषण