
मुरूड : प्रतिनिधी
देशातील लघु व सीमांत शेतकर्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने सुरू केली असून त्याची अंमलबजावणी सर्वच तहसील कार्यालयातून होत आहे. शेतकर्यांना मदत करणार्या या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा मुरुड तालुक्यातील पात्र शेतकर्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार परीक्षित पाटील बोलत होते. ज्याची भूधारणा दोन हेक्टरपेक्षा कमी आहे, असे शेतकरी या योजनेस पात्र असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. एकाच कुटुंबातील व ज्यांची नावे सातबार्यावर आहेत, अशा 18 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेता येणार आहे. वयोमानानुसार 55 ते दोनशे रुपये प्रतिमहा हप्ता वयाच्या 60 वर्षापर्यंत भरल्यास 60 वर्षांनंतर शेतकर्याला प्रतिमहा तीन हजार रुपये मानधन प्राप्त होणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबनिवृत्ती वेतन प्राप्त होणार आहे. लाभधारकाच्या हप्त्याची रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या खात्यातूनही वजा करण्याचा विकल्प उपलब्ध आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी या वेळी दिली. मुरुडमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची नोंदणी सुरु झाली असून, या योजनेची अधिक माहिती अथवा मार्गदर्शन मिळण्यासाठी इच्छुक पात्र शेतकर्यांनी संबंधित तलाठी अथवा ग्रामसेवकाशी संपर्क साधावा, असे आवाहन नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी पत्रकार परिषदेत केले.