चार हजारांहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला उपक्रमाचा लाभ
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आशियातील सर्वात मोठी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाविषयक विशेष तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये चार हजारांहून अधिक व्यापारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, मजूर यांची कोविड-19च्या अनुषंगाने तपासणी
करण्यात आली.
एपीएमसीमधील पाचही बाजारांत कोविड-19 तपासणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. तथापि मागील काही दिवसांमध्ये एपीएमसी मार्केट परिसरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी विशेष शिबिर घेण्यात आले. या तपासणीकरिता एक डॉक्टर व त्यांच्यासमवेत पॅरामेडिकल स्टाफ असे 30 वैद्यकीय समूह तयार करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय समुहासह डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि तेरणा रुग्णालय यांचेही वैद्यकीय समूह सहभागी झाले. या वेळी कोरोनासदृश लक्षणे आढळणार्या व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले. याकरिता प्रशिक्षित कर्मचार्यांसह दोन मोबाईल रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या विशेष शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.