उर्वरित जिल्ह्यात ऑरेंज झोन : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल
पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेसह संपूर्ण तालुका रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रेड झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश पनवेल तालुक्यासाठी लागू राहणार आहेत, तर उर्वरित रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने या तालुक्यांतील ऑरेंज झोनमधील टाळेबंदी काही अटींवर शिथिल करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन न करता तालुकानिहाय स्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे.
कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, मात्र आता लॉकडाऊन कालावधीतील हे मनाई आदेश यापुढेही 3 मेच्या रात्री 12पासून ते 17 मेच्या रात्री 12पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या 2 मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येतो. पनवेल महापालिका ही मुंबई महानगर क्षेत्रात मोडते. पनवेल महापालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता मनपा क्षेत्रासह संपूर्ण पनवेल तालुका रेड झोन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निर्देश जारी केले आहेत. यापुढे रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश संपूर्ण पनवेल तालुक्यासाठी लागू राहतील, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.