तळोजा ः रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक वसाहतीतून (एमआयडीसी) येणार्या वायु प्रदूषणातून तळोजा वासीयांची मुक्तता करावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये लॉकडाऊन काळात कोणते कारखाने सुरु आहेत, याकडे गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही व उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर शहरातील रहिवाशांना विशेषत: सेक्टर 30, 34, 35, 27, 19, 20, 21 येथील नागरिकांना मागील आठवड्यापासून (दि. 7 मे) मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस भयंकर अशा उदा. मेलेल्या माशांचा किंवा मांस जाळल्यासारख्या वासाला (वायु प्रदूषण) सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, दम्यासारखे आजार असणार्यांना तर खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे घरातील नवजात व लहान बाळांना देखील याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतांना दिसून येत आहे.
संपूर्ण देश हा कोरोना विषाणूशी लढत आहे, त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला असताना, अशा परिस्थितीत तळोजा औद्योगिक वसाहतीत नेमके कोणते कारखाने सुरू आहेत? याबाबत नागरिकांना प्रश्न चिन्ह आहे? या प्रकरणी तत्काळ लक्ष घालून रहिवाशांना होणार्या त्रासातून त्यांची मुक्तता करावी व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी नवी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रति पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख व नवी मुंबई बेलापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आली आहे.