लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यावरच देशात कोरोना महासाथीची दुसरी लाट अनपेक्षितपणे येऊन आदळली. या दुसर्या लाटेत तरुणांमधील संसर्ग मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणही सुरू करावे लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर नोकरी-व्यवसायात सक्रिय असणार्यांना फार काळ घरात ठेवून चालणार नाही. त्यामुळे या तरुण लोकसंख्येचे लसीकरण प्राधान्याने केले गेले पाहिजे. परंतु दुसर्या लाटेतील परिस्थिती बरीच गुंतागुंतीची असल्याने लसीकरणाचे आव्हान अधिक बिकट झाले आहे.
गेल्या वर्षी आपल्या देशात कोरोना महामारीचा शिरकाव झाल्यानंतर काही महिन्यांतच कोरोना प्रतिबंधक लस हाच तूर्तास या महासंकटापासून वाचण्याचा एक प्रमुख मार्ग असणार आहे हे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे लसनिर्मितीसाठी लागणारा काही वर्षांचा काळ लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लस वर्षभराच्या आत कशी निर्माण होणार याविषयी शंकाकुशंकांच्या वातावरणातच 2020च्या अखेरीस जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशी तयारही झाल्या. भारत हा जगातील बलाढ्य लसउत्पादकांपैकी एक असल्यामुळे अनेक देशांचे डोळे भारताकडे लागले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगभरातील मोठ्या लसउत्पादकांपैकी एक असल्याने सीरमकडून उत्पादित लशीचा बोलबाला जगभरात होता. या वर्षारंभापासून अॅस्ट्राझेनेका-सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ही लस युरोपातील अनेक देशांमध्ये वितरितही झाली. भारतात ती कोव्हिशिल्ड या नावाने वितरित होत असून भारतीयांना मोठ्या प्रमाणात हीच लस देण्यात आली आहे. याखेरीज भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे वितरणही देशभर सुरू आहे. भारत बलाढ्य लसउत्पादक असला तरी अफाट लोकसंख्येमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे मोठे आव्हान भारताला पेलावे लागणार याची चर्चा सुरूवातीपासूनच होती. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या भारताच्या 42 वर्षांच्या अनुभवाकडेही यावेळी बोट दाखवले जात होते. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, आव्हान मोठे आहेच याची खूणगाठ बांधूनच देशात लसीकरणाला सुरूवात झाली. कोरोना आघाडीवर लढणार्या डॉक्टरांचे तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात आले. पाठोपाठ ज्येष्ठ नागरिक आणि 45च्या पुढील सहव्याधी असणार्यांचे लसीकरण सुरू झाले. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत या घटकांना मोठा फटका बसल्यामुळेच लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्यात आले. परंतु दुसर्या लाटेत तरुणांबरोबरच लहान मुलांमधील संसर्गही वाढताना दिसत असून तिसरी लाट आल्यास लहान मुलांना अधिक प्रमाणात धोका उद्भवण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे. म्हणजे, आधीच अफाट लोकसंख्या आणि त्याप्रमाणात खूपच अपुरा भासणारा लसउत्पादनाचा वेग या परिस्थितीचा सामना करणार्या भारतासमोरील लसीकरणाचे आव्हान अधिकच बिकट झाले आहे. अर्थात अशा कठीण समयीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन सुयोग्य दिशेने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशात आताच्या घडीला 45 वर्षांवरील 31 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर देशभरात जवळपास 17.7 कोटी डोस वितरित झाले आहेत. देशांतर्गत लसउत्पादनात वाढ करण्याबरोबरच देशाबाहेरून अन्य विदेशी लशी आयात करण्यासही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. अनेक स्तरांवरील या प्रयत्नांतून आपल्या अफाट लोकसंख्येच्या लसीकरणाचे हे आव्हान आपण निश्चितपणे पेलून जाऊ अशी आशा करुया.