चिरनेर : रामप्रहर वृत्त
चिरनेर गावातील प्रत्येक वेशीवरच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारपासून नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात पोहचला असुन, उरण जवळच्या करंजा गावात कोरोना बाधित 57 रूग्ण सापडल्यामुळे करंजा गावाची पुर्ण नाकाबंदी केली आहे. दरम्यान याच उरण तालुक्यातील चिरनेर गावात बँका, दवाखाने, मेडीकल, भात गिरणी व मसाल्याच्या गिरणी असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही गावा बाहेरील नागरीकांची दिवसें-दिवस ये-जा सुरू होती. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर बाबीला आळा बसावा म्हणून, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन, चिरनेर गावातील प्रत्येक वेशीवरच्या प्रवेशद्वाराजवळ कालपासून नाकाबंदी करण्यात आली असुन, चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून, या गंभीर समस्येवर नियंत्रण रहावे, यासाठी पुरेपुर खबरदारी घेऊन, दक्षताही घेतली जात आहे. हायवे वरच्या बाजारपेठेतील इतर दुकानांबरोबरच किराणा मालाची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.