Breaking News

पाली, जांभूळपाडा, भालगूल पुलांच्या कामाला वेग

पाली : प्रतिनिधी – वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गावरील पाली येथील अंबा नदीवर नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. नवीन पूल अधिक उंच व रूंद असणार असून, त्याची भार पेलण्याची क्षमता तब्बल 75 टन म्हणजे जुन्या पुलापेक्षा साडेतीन पट अधिक असेल. या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांमधून होत आहे.

दरवर्षी मुसळधार पावसात अंबा नदी दुथडी भरून वाहते. या दिवसांत पुलावरून पाणी जाऊन दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबते. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून जातात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने जाणे, पुलावरील खड्डे यामुळे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. परिणामी पुलावरून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे. नवीन पुलामुळे आगामी काळात येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे. अशाच प्रकारे जांभूळपाडा आणि भालगूल येथेसुद्धा नवीन पुलांचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पाली पुलाची उंची 16 मीटर व लांबी 110 मीटर, जांभूळपाडा पुलाची उंची 16 मीटर व लांबी 70 मीटर, तर भालगूल पुलाची उंची 16 मीटर व लांबी 55 मीटर असणार आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे असणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे यांनी दिली.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार 15 एप्रिलपासून पाली-खोपोली मार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. या तिन्ही पुलांचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल. दर्जेदार व योग्य वेळेत काम पूर्ण करण्याचे आमचे लक्ष आहे.

-सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

Check Also

शिवसेना ‘उबाठा’चे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना …

Leave a Reply