बीडमधील घटनेने खळबळ
बीड ः प्रतिनिधी – शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार सामूहिक हल्ल्यातून तिघांची हत्या झाली असून अन्य एक जखमी आहे. मृतांमध्ये बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार या तिघांचा समावेश आहे, तर जखमीचे नाव समजू शकले नाही. यापैकी एक जण अद्याप पोलिसांना आढळून आला नाही.
केजच्या युसूफवाड पोलीस स्टेशन अंतर्गत मांगवडगाव येथील शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांसह अन्य एका व्यक्तीवर गावातील काही व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. मारहाण झालेल्या दोन कुटुंबांत शेतीवरून वाद होते अशी माहिती मिळत आहे. यात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले.
निंबाळकर कुटुंबातील 20 लोक मध्यरात्री आंबेजोगाईहून मांगवडगाव या गावी पोहचले. या वेळी पवार कुटुंबातील तिघांचा पाठलाग करून हत्या करण्यात आली. या वेळी पवार कुटुंबातील लोकं पळून जाऊ नयेत म्हणून हल्लेखोरांनी त्यांच्या मोटरसायकली फोडल्याचीही माहिती मिळाली. पवार आणि निंबाळकर कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून एका जमिनीच्या प्रकरणावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 2006मध्येसुद्धा या प्रकरणामध्ये पोलीस केसेस झाल्या होत्या. 2018 आणि 2019मध्येही पोलिसांनी यातील आरोपीविरोधांत कारवाई केली होती. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणी 17 जणांना अटक केली आहे.