कर्जत : बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून कर्जत बाजारपेठेत मिरची घेण्यासाठी पनवेल, मुरबाड, कल्याण, बदलापूर, उरण येथून अनेक नागरिक येत होते. हे सर्व लोक रेड झोन असलेल्या भागातून येत असल्याने कर्जतकरांनी आवाज उठवला होता. त्यामुळे व्यापारी फेडरेशनने तात्काळ निर्णय घेवून मिरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा मिरची विक्री व्यवसाय आता कर्जत नगरपालिका हद्दीमधील दहिवली भागात हलविण्यात आला असून दहिवली ग्रामस्थ आणि नागरिक संतप्त झाले आहे.
कर्जतची मिरची प्रसिद्ध असल्याने कर्जत शहरातील मिरचीच्या दुकानात उन्हाळा सुरू झाला की प्रचंड गर्दी होत असते. मात्र कोरोनामुळे असलेला लॉकडाऊन लक्षात घेता कर्जत मधील दुकाने बंद असून त्यात मिरची विक्री करणारी दुकाने देखील आहेत. परंतु मिरची खरेदी करण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून लोक वाहने घेऊन यायला लागल्याने कर्जत दहिवली व्यापारी फेडरेशनने निर्णय घेऊन मिरची विक्री बंद केली आहे. मात्र आता दहीवलीमधील मार्केट यार्डमधील दोन किराणा दुकानातून अजूनही ही मिरची विक्री सुरू आहे. कर्जत शहरात मिरची खरेदी करण्यासाठी आलेले लोक दहिवलीमध्ये जाऊन मिरची खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे दहिवलीत सध्या बाहेरील वाहनांची गर्दी सुरू आहे.
मिरचीचा व्यापार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार दहीवलीत सुरू असून यामुळे कर्जत शहरात कोरोना शिरकाव होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.