Breaking News

कामोठ्यातील ’गुरुप्रेम’चे सामाजिक दायित्व

कळंबोली : प्रतिनिधी

पनवेलपालिका हद्दीतील कामोठे शहरात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून काही सोसायट्यानी कोरोना विषाणूवर मात करत आपला आदर्श ठेवला आहे.

कामोठे वसाहतातील सेक्टर 10, प्लाट क्रमांक 53 मधील गुरुप्रेम हाऊसिंग सहकारी सोसायटीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात सामाजिक दायित्वाची भुमिका पार पाडताना सर्व सभासदांच्या सुरक्षेची काळजी घेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या गृहनिर्माण संस्थेत 70 सदनिका असून त्यात 40-50 लहान मुले आहेत.

30-35 वयोवुद्ध व्यक्ती वास्तव्य करत असून 10-15 अत्यावश्यक सेवोतील कर्मचारी मिळून 400 च्या घरात लोकवस्तीची संस्था आहे. या संस्थेने कामोठे शहरात कोरोनाने थैमान असताना आपल्या सोसायटीत शिरकाव करू दिला नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण इमारत सॅनिटायझर व निर्जंतुकीकरण करणे, इमारत आठवड्यातून दोन वेळा धुवून स्वच्छ करणे, अत्यावश्यक सेवेचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्या सर्व सेवा सभासदांना घरपोच करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केलो जाते. या कामी संस्थेने प्रत्येक मजल्यावर स्वंयसेवकांची नेमणुक केली आले. मित्र मैत्रिणी, नातेवाईक वा बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.

डॉक्टरांना मिळणार एन 95 मास्क

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई शहरातील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन एन 95 मास्क थेट उपलब्ध करून दिले. शहरातील प्रमुख औषध दुकानात हे मास्क डॉक्टरांच्या वापरासाठी उपलब्ध आहेत. महागडा असणार्‍या या मास्कचे उत्पादन वाढवण्यासाठी नवी मुंबई शहरातील डॉक्टर सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर ही अडचण दूर झाल्याने कमी शुल्कात आता हे मास्क उपलब्ध झाले आहेत. देशामध्ये सर्वप्रथम खाजगी डॉक्टरांसाठी एन 95 मास्क व डॉक्टर किटचे अनावरण 21 मे रोजी इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेतर्फे नवी मुंबईतील 10 ठिकाणी झाले. कोरोना संकटामध्ये योद्ध्याच्या भूमिकेत असणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत डॉक्टर व सहकारी कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक एन 95 मास्क हे सर्वप्रथम सरकारी रुग्णालयात देण्यात आले. या मास्कच्या उत्पादन व वितरणावर पूर्णपणे सरकारी नियंत्रण असल्यामुळे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना हे मास्क मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी विदेशातील महागडे मास्क डॉक्टरांना खरेदी करण्याची नामुष्की पत्करावी लागत होती. उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही खात्री नसल्याने सुरक्षिततेबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नवी मुंबईमध्ये उत्पादन होणार्‍या व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात होणार्‍या वीनस कंपनीमार्फत डॉक्टर किट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

एका बाजूला खासगी वैद्यकीय डॉक्टरांना सेवा देण्याबाबत विविध पातळीवरून वारंवार विनंती किंवा आदेश देऊनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद न मिळण्यामागे मुख्य समस्या ही सुरक्षा साधनांची कमतरता आहे हे जाणून त्यावर एक किंवा दोन मोफत मास्क वाटण्यापेक्षा काहीतरी ठोस उपाययोजना करण्यासाठी डॉक्टर मास्क किटच्या माध्यमातून दहा मास्कचे किट प्रत्येक महिन्याला डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे.

याद्वारे एक डॉक्टर व असिस्टंट यांना महिन्याभरासाठी याचा वापर करता येईल. यासाठी मास्कचा पुनर्वापर कसा करावा याबाबतचे मार्गदर्शन किटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खाजगी डॉक्टर आपल्या प्रिस्क्रिप्शनवर विनंतीपत्र देऊन सदर मास्कचे पॅक उपलब्ध करून घेऊ शकतात. हा प्रोजेक्ट नवी मुंबई मध्ये यशस्वी झाल्यानंतर मुंबई, ठाणे पनवेल, मिरा-भाईंदर तसेच देशपातळीवर राबविण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील व्यायामशाळा प्रशिक्षक अडचणीत

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाने सर्वच कारभार ठप्प झाले आहेत. अनेकांचे हातावर पोट असलेले लहान सहन व्यवसाय बंद पडले आहेत. त्यात शरीर सुदृढ ठेवण्याचे प्रशिक्षण देऊन समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवणारे व्यायामशाळा प्रशिक्षक देखील अडचणीत आहेत. अनेक महिने व्यायामशाळा बंद असल्याने त्यांना स्वतःच्या पोटाचा प्रश्न सतावू लागला आहे.

व्यायामशाळा म्हणजे शरीर कमावून निरोगी आयुष्य जगण्याचे ठिकाण. मात्र सध्या कोरोनामुळे व्यायामशाळाच बंद असल्याने अनेक प्रशिक्षकांवर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठमोठ्या व्यायामशाळेतील प्रशिक्षक हे पगारावर तर लहान व्यायामशाळा असल्यास जेवढे सदस्य असतील तितके कमिशन त्या प्रशिक्षकाला देण्यात येते. त्यामुळे चांगले प्रशिक्षण देऊन व्यायामशाळेचे नाव गाजवून सदस्य कसे वाढतील याकडे प्रशिक्षकांचा कल असतो. काही प्रशिक्षक हे पर्सनल ट्रेनरचे काम देखील करत असतात. मात्र सध्या हे सारेच ठप्प झाल्याने समाजाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राखण्यासाठी झटणारे व्यायामशाळेतील प्रशिक्षक चिंतेत आहेत. 31 मे रोजी येणार्‍या पाचव्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यायामशाळा प्रशिक्षकांचा विचार करून व्यायामशाळा सुरू कराव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.

अनेक व्यायामशाळेत 10 ते 12 हजारांच्या वर पगार नसतो. जर खासगी प्रशिक्षक झाले तर त्यांचा पगार बंद होऊन त्यास कमिशन बेसिसवर शिकवावे लागते. सध्या अनेकजण म्हणतात की ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करा. मात्र त्यात उदरनिर्वाहा इतकेदेखील उत्पन्न मिळत नाही. सध्या लोकडाऊनमुळे अनेकजण घरी आहेत. त्यामुळे व्यायाम शाळा सुरु केल्यास त्यात विविध बॅचेस तयार करून व योग्य ती खबरदारी घेत प्रशिक्षण देता येईल तसेच अनेक प्रशिक्षकांना पुन्हा उदरनिर्वाहाचे साधन मिळेल.

 -किशोर पाटील, व्यायामशाळा प्रशिक्षक, नवी मुंबई

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply