महाड ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणास्तव सातत्याने ठप्प होत असून यावर्षीदेखील लॉकडाऊनचा या कामात अडथळा निर्माण झाला. परिणामी ऐन पावसाळ्यात हा मार्ग दरडी आणि रस्त्यावर येणार्या पावसामुळे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम मागील सात ते आठ वर्षांपासून रखडले असून काम पूर्ण होण्याला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे, तर इंदापूर ते पात्रादेवी हे काम जलद गतीने उत्तम दर्जाचे झाले आहे, मात्र वीर, महाड ते कशेडी यादरम्यानचे एल अॅण्ड टीचे काम संथगतीने सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू केल्यानंतर सर्वच कामे थांबवण्यात आली. यामुळे महाडजवळ सुरू असलेले नांगलवाडी आणि केंबुर्ली गावाजवळील डोंगर फोडण्याचे कामदेखील थांबले. नांगलवाडी गावाजवळ नदीतून पर्यायी मार्ग काढण्यात आला, मात्र लॉकडाऊनमुळे या मार्गाचा वापर थांबला होता, तर केंबुर्लीजवळही डोंगर फोडण्याचे काम अर्धवट आहे. काम चालू करण्यासाठी कलेक्टर ऑर्डर मिळाल्याक्षणी नांगलवाडी येथील पूल तोडण्यात आला. आता 15 दिवसांत हा पूल बांधून वाहतुकीस खुला करणे शक्य नाही. त्यामुळे जूनलाच मुसळधार पाऊस झाल्यास पर्यायी मार्ग सावित्रीच्या पाण्याच्या पात्रात बुडून जाईल आणि महामार्ग बंद होईल.
पावसाळ्यात नांगलवाडीजवळ तयार केलेल्या पर्यायी मार्गावर दरड व नदीतील पाणी येण्याची, तर केंबुर्लीजवळही दरड कोसळण्याची शक्यता आहे. इंदापूर-पोलादपूरदरम्यान रस्त्यालगत माती ठेवण्यात आली आहे. चौपदरीकरणातील भरावही रस्त्यावर आहे. यामुळे पाणी व चिखल साचण्याची शक्यता आहे. सध्या काही ठिकाणी महामार्गावर कामे सुरू करण्यात आली आहेत, मात्र पाऊस तोंडावर असल्याने ही कामे पूर्ण होणार नाहीत. शिवाय कोरोनामुळे अनेक कामगारही गावी निघून गेले आहेत. त्यामुळे यावेळीदेखील हा महामार्ग ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर कामे सुरू केली आहेत. शिवाय पावसाळ्यात अडचण
होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
-अमोल महाडकर, प्रभारी महामार्ग अधिकारी
नांगलवाडीजवळ जुना मार्ग मोकळा केला जाईल. त्यामुळे पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला तरी अडचण निर्माण होणार नाही. -नायडू, प्रकल्प अधिकारी, एल अॅण्ड टी