नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या वतीने रोहे तालुक्यासाठी निरीक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
नागोठणे शहरासाठी नायब तहसीलदार नीलम ढोरमकर-सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे अरुण गणतांडेल, नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, तलाठी सजाचे गणेश विटेकर आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाने सोमवारी सकाळपासून बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणांना भेट दिली. या वेळी सोशल डिस्टन्सिंग तसेच इतर नियम पाळले जातात का याबाबत पाहणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार शहरात नियम न पाळणार्या 16 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकाकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे समजते. परिणामी प्रशासनाचे नियम न पाळणार्या व्यापारीवर्गाचे धाबे दणाणले आहेत.