Breaking News

तळोजा येथे दीड लाखांची घरफोडी

पनवेल : बातमीदार : धरणा कॅम्प, तळोजा येथे चोरट्यांनी दीड लाखांची घरफोडी केली आहे. तळोजा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन नारायण शेगर (वय 35) हे एका कंपनीमध्ये काम करत असून त्यांचे मालक हे राजस्थान येथे गेले असल्याने ते भंडार्ली येथे कंपनीमध्येच काही दिवसांसाठी राहण्यास गेले होते. त्यामुळे त्यांच्या धरणा कॅम्प येथील राहत्या घराला कुलुप लावण्यात आले होते. या वेळी चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचा दरवाजा तोडून 1 लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली.

14 वर्षीय मुलीचे अपहरण

तालुक्यातील नांदगाव कातकरवाडी, येथील एका 14 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही मुलगी इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत आहे. सकाळी तिची आई उठली असता तिला ती घरात दिसली नाही म्हणून कातकरवाडी व परिसरात तिचा शोध घेतला, परंतु ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तिचे वय 14 वर्षे, उंची 4 फूट 8 इंच, केस काळे, कुरळे, लांब, कपाळावर गोंधणाची फुली, नाक सरळ, चेहरा गोल, कानात कर्णफुले, अंगात भगव्या रंगाचा टॉप त्यावर लाल रंगाच्या पट्ट्या, जांभळ्या रंगाची लेगीज घातलेली आहे. तिने डाव्या हातात राखाडी रंगाच्या काचेच्या बांगड्या व उजव्या हातात विविध रंगाच्या मण्यांचे ब्रासलेट, डाव्या भुवईवर जुन्या जखमेचा व्रण असून, पायात जांभळ्या रंगाचे चप्पल घातलेली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हजारो रुपयांची दारू केली जप्त

वरचा ओवळा गावात जाणार्‍या रस्त्याच्या किनारी असलेल्या एका झोपडीच्या बाजूला अवैधरीत्या विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोंब, पोलीस उपनिरीक्षक अरविंद संखे, प्रतिबंधक स्टफ, पोहवा संजय केरूर, म्हात्रे, पोलीस नाईक हरेश पाटील यांनी धाड टाकली असता हजारो रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी विक्रम तुळशीराम दापोलकर (वय 35, खालचा ओवळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विजेच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

शहरातील मांडवकरवाडा पनवेल येथील सिद्धिविनायक को-ऑप हौ. सोसायटी येथे वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरणकडे प्राप्त झाली होती. या ठिकाणी छापा टाकला असता स्वप्नील अनंत स्वामी यांनी त्यांचे स्वतःचे घरगुती वापरासाठी त्यांचे जुने कनेक्शन बिल न भरल्यामुळे ते कायमस्वरूपी बंद केले असताना देखील अनधिकृतपणे उपकरणांचा वापर चालूच ठेवला होता. त्यांनी अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे महावितरणच्या लक्षात आले. त्यानंतर विद्युत कायदा 2003चे कलम 135 नुसार सिमेंट बिल रक्कम रु. 15  हजार 800 देण्यात आले, तर दुसर्‍या घटनेत कच्छी मोहल्ला येथील मरियम अहमद मिस्त्री यांनी अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे आढळून आल्याने चोरीसाठी वापरलेली सदर ठिकाणची 80 फूट सर्व्हिस वायर जप्त करण्यात आली. मागील दोन वर्षापासून वीजचोरी केल्याचे बिल देण्यात आले होते, परंतु त्यांनी ते बिल न भरल्यामुळे त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply