लंडन : वृत्तसंस्था
इंग्लंड संघाला जगभरातील कोणत्याही ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर असणार्या ‘बार्मी आर्मी’च्या धर्तीवर ‘भारत आर्मी’ची स्थापना करण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास 22 देशांमधून ‘भारत आर्मी’चे आठ हजार चाहते इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली.
1999मध्ये इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अवघ्या चार चाहत्यांनी मिळून ‘भारत आर्मी’ची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यात असंख्य चाहत्यांची भर पडली असून, विश्वचषकातील भारताच्या प्रत्येक सामन्याला पाच ते सहा हजार चाहत्यांची उपस्थिती असणार आहे.
‘भारत आर्मी’च्या चाहत्यांच्या समूहाचा जगभरातील विस्तार वाढत असून ब्रिटन, भारत, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत आमचे असंख्य चाहते आहेत. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधील भारतीय
संघाच्या सामन्यांना हजर राहण्याची बहुसंख्य चाहत्यांची मागणी असल्यामुळे आम्ही 2015मध्ये ‘भारत आर्मी ट्रॅव्हल्स’ची स्थापना केली आहे,’ असे राकेश पटेल या एका संस्थापकाने सांगितले.