Breaking News

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्याचे वितरण

रोहे : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिकाधारक व विनाशिधापत्रिकाधारक यांच्याकरिता मोफत धान्याचे व डाळींचे वितरण रास्त भाव धान्य दुकानांमार्फत सुरू करण्यात आले. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी केले आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य योजनेंतर्गत प्रतिसदस्य प्रतिमहा पाच किलो तांदूळ एप्रिल-जून या तीन महिन्यांकरिता देण्यात येणार असून प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका तूरडाळ अथवा चणाडाळ यापैकी एक डाळ प्रतिशिधापत्रिका एक किलो वितरित केली जाईल. विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जूनकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमहा पाच किलो तांदूळ तसेच प्रतिकुटुंब प्रतिमहा एक किलो अख्खा चणा वितरित करायचा आहे.

निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका पाच लिटर केरोसीन मोफत वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले. याचे वितरण शासनमान्य किरकोळ केरोसीन विक्रेत्यांमार्फत केले जाईल. संबंधितांनी आपापल्या परिसरातील रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेत्यांशी संपर्क साधून मोफत धान्य व केरोसीन प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply