पोलीस निवारा केंद्राची उभारणी
खोपोली ः प्रतिनिधी
तालुक्यातील लघुउद्योगनगरी असलेल्या साजगाव परिसरात वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा बसावा यासाठी पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पोलीस निवारा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या साजगावमध्ये कारखानदारी हातपाय पसरत आहे. परिणामी विकासाबरोबरच येथे गुन्हेगारीदेखील चोरपावलांनी येत असून येथे नुकताच खोपोली पोलिसांनी गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
खोपोली-पेण राज्य मार्ग, पाली फाटा तसेच द्रुतगती मार्ग लगत असल्याने येथे वाहतुकीचादेखील प्रचंड ताण असतो. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकी असावी, अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी होती. ग्रामस्थांच्या या मागणीला पोलीस विभागाकङून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकसहभागातून येथे निवारा शेड उभारण्यात आली आहे. सोमवारी पोलीस निवारा केंद्राचे उद्घाटन खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, रसायनी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. पी. मुल्ला, राजिप सदस्य नरेश पाटील, नगरसेवक सुनील पाटील, अतुल पाटील, उद्योजक दीपक कडव, अनिल खालापूरकर, विक्रांत पाटील, गार्गी कंपनीचे व्यवस्थापक राजू गावडे, होनाड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, साजगावचे सरपंच अजित जाधव, सदस्य अजित देशमुख, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.