माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांचा घणाघात
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाविकास आघाडी सरकारला राज्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. फक्त स्वतःचे भले करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले असून लूट, लूट आणि लूट हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन प्रोग्राम आहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी (दि. 18) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोठे होते, पण आताची शिवसेना बाळासाहेबांची राहिली नसल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणार्या उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बूथ कमिटीच्या माध्यमातून खासदार प्रकाश जावडेकर संवाद साधत आहे. त्या अंतर्गत त्यांनी शनिवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या अनुषंगाने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मिशन लोकसभा 2024साठी भाजप सज्ज असल्याचे या वेळी खासदार जावडेकर यांनी नमूद केले.
खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजपमध्ये बूथ कमिटीला महत्त्व असल्याचे सांगत मावळ लोकसभा मतदारसंघातील बूथ अधिक सक्षम करण्यासाठी मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या दृष्टीने बूथ जिता तो देश जिता ही महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक बूथ सक्षम करण्याची योजना आखण्यात आली आहे. भाजपचे लोकसभेत 303 खासदार आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी पक्ष अधिक मजबूत करण्याचा आणि ज्या ठिकाणी खासदार नाहीत त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारतीय जनता पक्ष मेहनत करून जिंकणारा आणि दिवसाचे 24 तास काम करणारा पक्ष आहे. भाजप जनतेच्या ताकदीवर लढतोय आणि सर्वांचा विश्वास संपादन केलेला हा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकास कार्यक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचत असून त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग निर्माण झाला आहे.
पंतप्रधान आवास योजना, शौचालय योजना, शेतकरी सन्मान योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, ई-श्रम कार्ड, कोरोना प्रतिबंधात्मक लस, आयुष्यमान भारत योजना, अन्न सुरक्षा योजना अशा विविध लोकोपयोगी योजना राबवत देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम यशस्वीपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या दूरदृष्टी व कार्यक्षम नेतृत्वामुळे संपूर्ण जगात आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे खासदार जावडेकर यांनी सांगितले.
वैश्विक महामारी कोरोना काळात देशाला सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या लोकहिताच्या निर्णयामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लस सर्वांना उपलब्ध झाली. आतापर्यंत 195 कोटी मोफत लसीकरण झाले आणि या महत्त्वाच्या मोहिमेमुळे आपला देश कोरोनाच्या संकटातून मोठ्या प्रमाणात बचावला, असे सांगून मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या अनुषंगाने सर्वांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन खासदार जावडेकर यांनी केले.
राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे तसेच खासदार श्रीरंग बारणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावून निवडून आले आहेत, मात्र शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली असल्याचे जावडेकर यांनी सांगून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असल्याचे म्हटले. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पावसाळ्यातील महापुराची भरपाई पूरग्रस्तांना राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अद्याप मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महाविकास आघाडीत बिघाडी आहे, पण सत्तेसाठी त्यांची लाचारी सुरू आहे. महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर नेण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे जनतेवर होणार्या अन्यायाविरुद्ध आमचा लढा जोरदार राहणार आहे, असेही खासदार जावडेकर यांनी स्पष्ट केले.
भूमिपूत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटीलसाहेब मोठे व्यक्तिमत्व. नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी लढा उभारला आहे. राज्य सरकारकडून दिलेल्या प्रस्तावावर केंद्र विचार करते, आता राज्य सरकारवर त्याची जबाबदारी असून हे सरकार काय करणार याची प्रतीक्षा आहे.
-खासदार प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री