रोहे ः प्रतिनिधी
रोहा शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने रोहा बाजारपेठ गेली नऊ दिवस बंद होती. नऊ दिवसांनंतर रोहा बाजारपेठ बुधवारी (दि. 1) उघडल्यानंतर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिक बाजारात खरेदीसाठी वावरताना दिसत होते.
बुधवारी रोहा बाजारपेठ पूर्णपणे उघडल्याने रोहेकरांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. किराणा, भाजीसह अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात आले होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून काही नागरिक तर मास्कविनाही दिसून आले. रोहा शहर तालुक्याची बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील लोक येथे मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. रोहा शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधित आढळल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रोहा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. बाजारपेठ सुरू होण्याआधी रोहा आडवी बाजारपेठेमध्ये दुचाकी आणण्यास मनाई केल्याने या ठिकाणी कमी गर्दी दिसून आली, परंतु रोहा एसटी स्टॅण्ड ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत भाजी खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून आली. या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नव्हते. त्यामुळे रोहा बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.