कर्जत ः बातमीदार
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेने कोरोनावर मात करून ते पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या वेळी त्यांचे आरोग्य कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
कोरोना विषाणूने कर्जतमध्ये शिरकाव केल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर, परिचारिकांनाही ग्रासले होते. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा सेवेसाठी सज्ज झाले. ते सेवेसाठी रुजू झाले तेव्हा त्यांचेही पोलीस ठाण्यात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संजीव धनेगावकर, डॉ. संगीता दळवी आणि परिचारिका वैशाली वाघ-महाजन कोरोनावर मात करून सेवेसाठी रुजू झाले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे आणि त्यांच्या स्टाफने या तिन्ही कोरोना योद्ध्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याबाबत डॉ. संजीव धनेगावकर यांनी सांगितले की, आपल्याला जेव्हा कोरोनाची लागण झाल्याचे कळाले तेव्हा मला धक्काच बसला, परंतु मला योग्य उपचार मिळाले आणि मी कोरोनावर सहज मात केली. कोरोनाची बाधा झाल्यास घाबरून जाऊ नका. इच्छाशक्ती आणि योग्य समुपदेशन झाल्यास कोणताही त्रास न होता कोरोना बरा होतो हा माझा स्वानुभव आहे. कोरोना झालेल्या परिचारिका वैशाली वाघ-महाजन यांनी सांगितले की, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मी मनातून खूप घाबरले. कारण माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती, परंतु मला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे अन्य रुग्ण बिनधास्त होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आणि स्वतःला सावरून अर्धी बरी झाले. तेथे मला योग्य उपचार मिळाले.