Breaking News

श्रीवर्धनमधील जीवना कोळीवाडा अंधारात

महिनाभरानंतरही वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण

श्रीवर्धन : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळ होऊन आता महिना उलटायला आला तरीही श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाड्यातील वीजपुरवठा खंडितच आहे. मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसेच खासदार व बडे नेेते जिल्ह्याचा दौरा करून गेले, मात्र श्रीवर्धनची विद्युतसेवा पूर्ववत करण्यात राज्य शासन आणि महावितरणला अद्यापही यश आले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त तडाखा श्रीवर्धन तालुक्याला बसला. वादळात अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. नारळी-फोफळीच्या वाड्या, बागायती उद्ध्वस्त झाल्या. त्याचप्रमाणे विद्युत खांब मोठ्या प्रमाणात कोसळले. चक्रीवादळ येणार म्हणून एक दिवस आधीच म्हणजे 2 जूनला येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याला आता एक महिना पूर्ण होईल, मात्र तालुक्यातील जीवना बंदर कोळीवाड्यातील नागरिक अजूनही अंधारात आहेत.
आधीच गेले तीनपेक्षा जास्त महिने कोरोनामुळे लोक घरात होते. त्यानंतर चक्रीवादळाच्या फटक्याने लोक हतबल झाले आहेत. अशातच जीवना कोळीवाडा येथील शेकडो नागरिकांना अंधाराशी सामना करून जीवन जगावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचा कालावधी आहे. अनेक जण साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. तरीही येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासन, प्रशासन आणि महावितरणकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. आज, उद्या तुमच्याकडे लाइटची कामे करण्यास सुरुवात करतो, असे उत्तर महावितरणच्या अधिकारीवर्गाकडून मिळते, मात्र कार्यवाही होत नाही. त्यामुळे अजून किती दिवस अंधारात राहावे लागणार, असा संतप्त सवाल जीवना येथील नागरिक करीत आहेत.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply