Wednesday , June 7 2023
Breaking News

नेट डिस्कनेक्टीव्हीटीमुळे बँक ग्राहक त्रस्त ; सॉफ्टवेअर अपडेटच्या कामामुळे कमकाज मंद, महाडमधील खाजगी बँका तेजीत

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील राष्ट्रीय बँकांच्या नेट डिस्कनेक्टीव्हीटीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही. त्यातच या बँकांमधील ऑनलाईन प्रणाली सुरक्षित करण्याच्या नावाखाली एसबीआयसारख्या बँकांच्या अनेक सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने बँक ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहे. या धर्तीवर तत्काळ सेवा देणार्‍या खाजगी बँकांचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे. बीएसएनएलच्या लिज लाईन व्यतिरिक्त अन्य खाजगी कंपन्यांच्या लिज लाईनची बँकाना मिळणे गरजेचे आहे.

महाड हा भौगोलिक विस्ताराने मोठा तालुका असून या तालुक्यातील बहुतांशी गावे ही दुर्गम भागात आहेत, तसेच औद्योगिक आणि पर्यावरणदृष्ट्या या तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. या विकासाबरोबर बँकिंग क्षेत्राचाही विकास होणे गरजेचे आहे, मात्र ऑनलाईन बॅकिंगच्या आजच्या जमान्यात महाडमधील राष्ट्रीय बँका आजही मागासलेल्या अवस्थेतच आहेत. शंभर टक्के इंटरनेटवर अवलंबून असलेल्या महाडमधील बँका, नेट नसल्याकारणाने आठवड्यातील चार चार दिवस बंद राहत आहेत. एकट्या एसबीआय या बँकेचे तालुक्यात 40 हजार ग्राहक आहेत. दूर खेड्यापाड्यातून पेन्शन घेण्यासाठी आलेले नागरिक असो वा शासकिय भरणा करणारे ग्राहक असो वा व्यापारी असो की विद्यार्थी असो, सर्वांचे बँका सतत बंद पडत असल्याने मोठे हाल होत आहेत. नेट डिस्कनेक्टमुळे बँका, तसेच एटीएम, सीडीएम अर्थात कॅश डिपॉझीट मशीन, ग्रीन चॅनल सेवादेखील प्रभावित होत असल्याने, या सेवांचाही ग्राहकांना फायदा होत नाही, तसेच ऑनलाईन बॅकिंगमध्ये होत असलेल्या चोर्‍या आणि फ्रॉड यांच्या सुरक्षा कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून एसबीआय बँकेचे बॅकिंग सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा बँकेचे कामकाज मंदगतीने सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना केवळ बीएसएनएलच्या लिज लाईनद्वारेच इंटरनेट सेवा पुरविली जाते, मात्र एसबीआय या बँकेने एअरटेल, आयडीआय, जीओ आणि वोडाफोन या खाजगी कंपन्यांनादेखील ही सेवा पुरविण्याचे आवाहन केले होते, मात्र केवळ वोडाफोन वगळता कोणत्याच कंपनीने लिजलाईन देण्यास समर्थता दर्शविली नाही. या खाजगी कंपन्यांनी जर ही लिजलाईन सेवा बँकांना दिली, तर महाडमधील बँकांचा हा मोठा प्रश्न कायमचा मिटणार आहे, तसेच महाड एमआयडीसीमधून बीएसएनएलने ओएफसी कनेक्टीव्हीटी दिल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो, अशी माहिती एसबीआय बँकेचे व्यवस्थापक अमल अशोक यांनी दिली आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply