पनवेल : रामप्रहर वृत्त
कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ’गुरुवंदना’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाअंतर्गत पनवेल महापालिकेतील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यकामगार, शिक्षक व नवी मुंबई झोन 2 उपयुक्तालयाचे पोलीस यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दिलेल्या धैर्य, संयम आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती या शिकवणीबाबत या कर्मगुरूंना मानपत्र देवून गौरविण्यात आले.
प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांनी ’निसर्ग हाच गुरू’ या विषयावर प्रबोधन केले. गुरू ही एखादी व्यक्ती नाही तर एक तत्व, प्रवृत्ती असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना निसर्ग गुरू आपल्याला खूप काही शिकवतो, असे ते म्हणाले.
पनवेलचे आयुक्तसुधाकर देशमुख यांनी कार्यक्रमात सहभाग घेवून संस्कार भारतीच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. पनवेल समितीच्या अध्यक्ष वैजयंती बुवा, सचिव सुलक्षणा टिळक आणि विधा समन्वयक सुनिता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, रेखा बुवा, नमिता बुवा, निधी व आद्या दलाल, पुजा आंबवणे, मच्छिन्द्र पाटील, जुईली चव्हाण, नेहा खरे, अक्षय गायकर, सिद्धेश झारे, अपर्णा नाडगौंडी आणि अमित चव्हाण यांनी ऑनलाइन गुरुवंदना साकारली. या माध्यमातून देशोविदेशी हजारो लोकांपर्यंत गुरुवंदना कार्यक्रम पोहचला.
कोरोना निर्मुलनासाठी प्रशासन अविरत प्रयत्न करत आहे. महापालिकेतील प्रत्येक घटक हा योद्धा आहे. अनेक कर्मचारी स्वतः कोरोनाग्रस्त असूनही ऑनलाइन पद्धतीने जबाबदारी पार पाडत आहेत. याबद्दल संस्कार भारतीसारख्या संस्थांनी त्यांची घेतलेली दखल मोलाची आहे. सर्व नागरिकांनीही यासाठी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
– सुधाकर देशमुख,
आयुक्त, पनवेल मनपा