नवी मुंबई : बातमीदार
पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सीवूडमधील पंकज सातपुते व रोहन पाटील यांनी गेल्या अनेकवर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीस ठेवल्या आहेत. कालानुरूप आता या व्यवसायाला ऑनलाइन स्वरूप आणताना उभा दोन तरुणांनी माझा मोरया अॅप विकसित केले असून त्याद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करताना कोरोनाच्या महामारीत आर्थिक चणचण भासणार्या कुटुंबियांना अवघ्या 101 रुपयांत गणेशमूर्ती देण्यात येणार आहे.
यंदा देशावर व राज्यावर कोरोनाचे संकट गडद झाल्याने सुरक्षिततेचे नियम पाळावे लागणार आहेत. श्रावण महिना सुरू होताच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. मात्र यंदा भक्तांना कोरोनाची भीती सतावते आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी माझा मोरयातर्फे अॅप बनवण्यात आले आहे. त्यानुसार भक्तांना आपली नोंदणी करावी लागणार असून, गर्दी टाळण्यासाठी पाच दिवस अधिच गणेशमूर्ती घरी घेऊन जाता येणार आहे. बाप्पासोबत बाप्पानेच निर्माण केलेल्या पर्यावरणाचे रक्षण करणार्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. शाडूच्या मूर्तींसोबत कागदाच्या लगद्यापासून बनलेल्या, गणेशा तयार करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव म्हटल की, भक्तगण काही दिवसापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी करतात. रंगकाम, डेकोरेशन, याबर बराच खर्च केला जातो. आपल्या सर्वांच्या आवडता बाप्पा असल्याने तो जिव्हाळ्याचा विषय बनून हातचे राखून न ठेवता बाप्पाची सेवा केली जाते. मात्र कोरोनामुळे यंदा सर्वांवरच आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांना यंदा बाप्पाची वारी चुकते की काय असे वाटू लागले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत माझा मोरयाच्या पंकज सातपुते व रोहन पाटील यांनी या अवघ्या 101 रुपयांत गणेशाची मूर्ती गरजवंतांना देण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे अनेकांना आपला गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.