सिडनी : वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणांच्या निकषावर भारत अंतिम फेरीत दाखल झाला, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच धावांनी पराभव करीत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक दिली.
ऑस्ट्रेलिया संघाने 2010पासून प्रत्येक अंतिम फेरी खेळली आहे. 2016मध्ये त्यांचा वेस्ट इंडिजने पराभव केला, तर 2018मध्ये इंग्लंडचा पराभव करीत त्यांनी चौथे विजेतेपद पटकाविले होते. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. त्यात भारताने बाजी मारली. आता या स्पर्धेतील अंतिम सामना पुन्हा याच दोन संघांमध्ये होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेत साखळीतील सर्व सामने जिंकून अजिंक्य आहे, तर ऑसी संघ भारताविरुद्धचा पराभव वगळता यशस्वी ठरलेला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडल्याने भारताला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला नमविले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सलामीच्या पराभवाचा वचपा काढणार की भारतीय संघ पुन्हा वर्चस्व गाजविणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.