नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बँकेत आलेल्या दोघा व्यक्तींनी चाकूच्या धाकावर लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रोकड पळवली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास बँकेत 6 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बँकेत आलेल्या दोघांनी एका कर्मचार्याला चाकूच्या धाकावर धरले. त्यानंतर लॉकर रूम उघडायला लावून त्यामधील सुमारे साडेचार लाख रुपये लुटून पळ काढला. या घटनेनंतर बँक कर्मचार्यांनी पोलीस कंट्रोल ला कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
बँकेत आलेले दोघेही 30 ते 35 वयोगटातील होते. शिवाय तोंडाला मास्क देखील लावलेले होते. तर हाताचे ठसे उमटू नयेत याकरिता देखील हातात ग्लोज घातलेले होते. दरम्यान लॉकडाऊनच्या अनुशंघाने शहरात तसेच कोपर खैरणे परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. रस्त्याने ये जा करणार्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. यानंतरही त्या दोघा लुटारूंनी बँक लुटल्यानंतर शहराबाहेर पळ काढला कसा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर भरदिवसा चाकूच्या धाकावर बँक लुटल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या दोघांनी अगोदर बँकेची रेकी करून दरोडा टाकल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.