Breaking News

‘बकरी ईदला वैयक्तिक कुर्बानीची परवानगी द्यावी’

कळंबोली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे, तर शासन ऑनलाइन व दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करण्याचे आदेश देत आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव संभ्रमात पडले आहेत. त्या अनुषंगाने कोरोना साथीच्या अटी व शर्थी पाळून ईदचा सण साजरा करण्यात येईल तेव्हा वैयक्तिक कुर्बानी देण्याला परवागी देण्यात यावी, अशी मागणी कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फे भाजप रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर शेख यांनी कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोनाच्या महामारीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे शनिवारी बकरी ईद साजरी करताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ईदची नमाज मस्जिद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. मुस्लिम बांधव शासन न प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत बकरी ईद घरीच साजरी करताना घरीच व गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करून वैयक्तिक कुर्बानी देण्यात येईल या विचारात आहेत, पण या वैयक्तिक कुर्बानीला विरोध केला जात आहे. कुर्बानी देताना गर्दी न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिसेल्या अटींच्या अधीन राहून हा सण साजरा करू, अशी हमी देत भाजपचे रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांनी प्रतीकात्मक कुर्बानीला परवानगी देण्याची मागणी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.

चौकडीचा मंगळसूत्रावर डल्ला

मोहोपाडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटातही सोन्याचे वाढते भाव पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली असताना तीन महिला आणि एक पुरूष अशा चौकडीने चौक येथील पेढीवर 73 हजारांच्या मंगळसूत्रावर हात साफ केल्याची घटना घडली आहे. ग्राहक बनून आलेल्या चौघांनी सुवर्णकार सागर ओसवाल (कोल्हापूर पेठ, चौक, ता. खालापूर) यांच्या नकळत 73 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरले. याबाबत ओसवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे चार अज्ञात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक एस. सुतार करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply