मुरूड ः प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या बागायतदारांच्या नारळ-सुपारीला अल्प भाव दिल्याने मुरूड येथील संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला आता किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांनीसुद्धा पाठिंबा दिल्याने हे आंदोलन व्यापक होणार आहे. किसान क्रांती संघटनेचे लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव सदस्य असून होणारे आंदोलन विराट स्वरूपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विरकुड यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून पाठिंबा दर्शविल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले आहेत.
किसान क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी मुरूड येथील संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विरकुड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. नारळ-सुपारीला चांगला भाव मिळण्यासाठी करीत असलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन श्रीधर जंजीरकर यांनी केले आहे. या वेळी जंजीरकर म्हणाले की, शासनाने नारळ-सुपारी व आंब्याला दिलेली नुकसानभरपाई म्हणजे शेतकर्यांची केलेली क्रूर चेष्ठा आहे. रायगड व अन्य जिल्ह्यांत निसर्ग चक्रीवादळ हे प्रथमच आले असून कोकणाला शासनाने झुकते माप देणे आवश्यक होते, परंतु जी सुपारी मुळासकट कोसळली तिचे उत्पादन पुन्हा घेता येणार नाही. त्याचप्रमाणे नवीन लागवडही 10 वर्षे झाल्याशिवाय होणार नाही. या बाबी माहीत असतानासुद्धा शासनाने खूपच अल्प भाव दिल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहेत.