पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यातील कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या फार कमी असल्याने त्यासाठी तरतूद व्हावी तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा आडमुठेपणा व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मेलद्वारे मागणी केली होती. या बाबींची पूर्तता न झाल्यास त्यांनी पेण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची शासनाने दखल घेतली असून दोन दिवसांपासून पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व टेक्निशियन दाखल झाले आहेत.
पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. खोलवडीकर हे यापूर्वी कार्यरत होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पनवेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पेणमधील कोरोनाबधितांचा वाढता आकडा लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा पेण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत करण्यात यावे व नवीन टेक्निशियन पाठवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी केली होती. त्याची दखल घेऊन दोन दिवसांपासून पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व टेक्निशियन दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे पेण तालुक्यात असणार्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांनी पेण उपजिल्हा रुग्णालयातील वाढते रुग्ण लक्षात घेता आठवड्यातील एक वार याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात कामकाज करावे, असे आदेश उपविभागीय अधिकारी पेण यांनी देऊनही हे डॉक्टर या रुग्णालयात का हजर राहत नाहीत याची गोपनीय माहिती घेऊन या डॉक्टरांची सखोल चौकशी करावी, अशीदेखील मागणी बेकावडे यांनी केली असून याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.