Breaking News

वादळी पावसामुळे रायगडात नुकसान

अनेक ठिकाणी बत्ती गूल

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 5) झालेल्या वादळी पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे. काही भागांमध्ये पाणी शिरल्याने, तसेच छपरे उडून व झाडे उन्मळून नुकसान झाले आहे. दुसरीकडे विद्युतसेवेवरही याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे.
हवामान खात्याने 4 ते 6 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी त्याची तीव्रता वाढली आणि बुधवारी दुपारनंतर त्याने जोरदार बरसात केली. सोबत सोसाट्याचा वाराही वाहत होता. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या झाल्या. सायंकाळी वार्‍याचा वेग वाढल्याने काही ठिकाणी पत्रे, कौले उडाली. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबदेखील पडल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. गुरुवारी सकाळी महावितरणने काम हाती घेतल्यानंतर दुपारच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत झाला, मात्र ग्रामीण भागात वीजप्रवाह सुरू व्हायला वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाड शहराला गुरुवारी तिसर्‍या दिवशीही पुराचा वेढा कायम होता, तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याने घरांचे नुकसान होऊन गुरेही दगावली आहेत. रोह्यातही पूरपरिस्थिी कायम दिसून आली. कुंडलिका नदीचे पाणी आल्याने रोहा-अष्टमी जुना पूल बंद करण्यात आला. रोहा केळघरमार्गे मुरूड हा रस्ता तांबडीच्या पुढे कोळघर फाट्यानंतर वळणावर वाहून गेला. खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.
माणगावमधील बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
माणगाव : माणगाव तालुक्यातील रातवड येथील धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (दि. 6) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सापडला. आशुतोष संतोष कुचेकर (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आशुतोष हा रातवड येथील धरणात 4 ऑगस्ट रोजी पोहायला गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. अखेर गुरुवारी पहाटे 3.58 वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात 24 तासांमध्ये सरासरी 209 मिमी पाऊस
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 6) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 209.05 मिमी पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 62.90 टक्के पाऊस पडला आहे.
दोन दिवस दक्षिण रायगडात पावसाचा जोर होता. बुधवारी उत्तर रायगडमध्ये पावसाने थैमान घातले. उरणमध्ये सर्वाधिक 323 मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल रोहा येथे 304 मिमी पाऊस पडला.
तालुकानिहाय पाऊस (आकडेवारी मिलीमीटरमध्ये)
उरण 323, रोहा 304, श्रीवर्धन 238, तळा 237, माणगाव 222, पेण 220, पनवेल 217, माथेरान 214.20, मुरूड व सुधागड प्रत्येकी 211, म्हसळा 200, अलिबाग 187, पोलादपूर 182, महाड 181, कर्जत 107.60, खालापूर 90; एकूण 3344.80; सरासरी 209.05.
म्हसळ्यातील तरुण बेपत्ता; शोधकार्य सुरू
म्हसळा : जोरदार पावसात म्हसळा तालुक्यातील जानसई नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्याचा शोध सुरू आहे.
म्हसळा तालुक्यालाही बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी दुथडी भरून वाहत होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या नदीमध्ये पोहायला गेलेल्यांपैकी बदर अब्दल्ला हळद (रा. म्हसळा, वय 23) हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे, पण अद्याप यश आलेले नाही.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply