पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेत काम करणार्या सर्व कामगारांना कोविड-19 भत्ता देण्याची मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी सोमवारी (दि. 31) झालेल्या महासभेत चर्चेच्या वेळी केली. आपण याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
सद्यस्थितीत महापालिकेत ठोक मानधन, ग्रामपंचायत वेतन श्रेणी आणि कंत्राटी कामगार अशा तीन प्रकारांत कामगार काम करीत आहेत. ठोक मानधनावर काम करणार्या कामगारांना प्रतिदिन 300 रुपये कोविड भत्ता दिला जाणार आहे, परंतु कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वच कामगार अहोरात्र काम करीत असल्याने त्या सर्वांनाच प्रतिदिन 300 रुपये कोविड भत्ता देणे गरजेचे आहे. महापालिकेचे सर्वच कामगार कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासून चांगले काम करीत आहेत. त्यांचा सन्मान होण्यासाठी आपण ही मागणी केली आहे. आपल्या या मागणीला आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत आपण हा विषय मांडला असल्याचे सांगून, आयुक्तांनी त्यासाठी येणारा खर्च मोठा असला तरी पुढील सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचेही नगरसेविका तुपे यांनी याबाबत बोलताना सांगितले.